आयआयटी खरगपूरच्या प्लॅटिनम जुबलीत मोदींनी केले विशेष स्मारक नाण्याचे अनावरण; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
खरगपूर (पश्चिम बंगाल) |
देशातील पहिले आयात असलेल्या आयआयटी खरगपूरच्या ७५ वर्षपूर्ती – प्लॅटिनम जुबली सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विशेष स्मारक नाण्याचे अनावरण केले. हवामानामुळे उशीर झाल्याबद्दल माफी मागत मोदी यांनी कलाईकुंडा हवाई तळावरून रस्त्याने खरगपूर गाठले. हा त्यांचा आयआयटी खरगपूरचा पहिलाच दौरा ठरला. यावेळी त्यांनी ‘विकसित भारतासाठी ७५ आवाज’ उपक्रमांतर्गत ७५ गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला, सेनेट हॉलमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे आणि संशोधन प्रोटोटाइपचे प्रदर्शन पाहिले आणि परवडणाऱ्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या नवकल्पनांचा आढावा घेतला. या सोहळ्याला पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार उपस्थित होते.
भाषणात मोदींनी आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. “देशाचे पहिले आयआयटी म्हणून आयआयटी खरगपूरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा आयआयटी खरगपूरने प्रवास सुरू केला, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून थोडाच काळ झाला होता, देशात पहिली सार्वत्रिक निवडणूकही झाली नव्हती. तेव्हा भारताला उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अभियंत्यांची गरज होती,” असे ते म्हणाले. “रंग-रूपाने सजलेली ही आयआयटी खरगपूरची भूमी आज अशा तरुणांना घडवत आहे, ज्यांचे इनोव्हेशन आणि कल्पना भारताला आत्मनिर्भर बनवण्याची ताकत बनत आहेत. हीच ती भूमी आहे, जिथे कधी स्वशासनाची (सेल्फ रूल) आकांक्षा होती, आज तिथे आत्मनिर्भरतेचा (सेल्फ रिलायन्स) संकल्प दिसतोय. तेव्हा स्वातंत्र्याचे स्वप्न होते, आज भविष्य घडवण्याची संधी आहे,” असे मोदी म्हणाले.
आव्हानाला प्रति-आव्हान देण्याचा माझा स्वभाव!
या परिसरावर कधी स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे डिटेन्शन कॅम्प होते, याची आठवण करून देत त्यांनी म्हटले की, “माझ्या स्वभावातच आहे की, मी आव्हानाला प्रति-आव्हान दिल्याशिवाय राहू शकत नाही. देशाने आपली क्षमता तेव्हाच ओळखली, जेव्हा त्याने मर्यादा तोडल्या आणि शक्यता उघडल्या.” बैलगाडीपासून बुलेट ट्रेनपर्यंत आणि टपाल पत्रांपासून सोशल मीडिया संदेशांपर्यंतच्या ७५ वर्षांच्या प्रवासात आयआयटी खरगपूरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत, “चिपपासून शिपपर्यंत सर्वकाही भारतातच बनेल” आणि आयआयटी खरगपूरची १०० वी वर्षगाठ साजरी होईल तेव्हा भारत विकसित देश बनला असेल, असा संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.