स्वातंत्र्य दिनी गडकरी रंगायतन येथे रंगला गुरू-शिष्य परंपरेचा ‘अर्पण’

0

ठाणे : गुरु-शिष्य परंपरेतील संस्कार, कृतज्ञता आणि संगीताप्रती समर्पणाचा सुरेल आविष्कार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगलेल्या ‘अर्पण’ या सांगीतिक सोहळ्यात अनुभवायला मिळाला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक शिष्यांनी बासरीवर रागदारी आणि सिनेगीत यांचं बहारदार सादरीकरण केलं.

‘अर्पण’मध्ये ‘बासरी रंग’ कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम जय जगदीश हरे’ या मंगलमय रचनेने झाली. त्यानंतर राग भूपाली, यमन, भीमपलास, तिलक कामोद, हंसध्वनी, तोडी, शंकरा अशा विविध रागातील रचना सादर केल्या. तर ‘संदेसे आते हैं’, ‘ये जो देश है तेरा’, ‘गहरा हुआ’ ही सिनेगीत तर ‘चिंब भिजलेले’, ‘बरसो रे मेघा’, ‘गरज गरज’ आणि ‘ऐ वतन तेरे लिये’ या गाण्यांच्या मेडलीने कार्यक्रमाची रंगत वाढली. भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर झलक आणि समकालीन संगीताचा आविष्कार यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला.शास्त्रीय रागांची नजाकत, चित्रपटगीतांची भावपूर्णता आणि समूहवादनाची ऊर्जा यामुळे कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.

‘अर्पण’ हा केवळ सांगीतिक कार्यक्रम नसून गुरूंप्रती कृतज्ञता, संगीताप्रती समर्पण आणि भारतीय संगीत परंपरेविषयी आदरभाव व्यक्त करणारा सोहळा ठरला. गुरुने दिलेली विद्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवताना त्यात आपले योगदानही अर्पण करण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. या कार्यक्रमात पं. विवेक सोनार यांचे गुरु, जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळाही पार पडला. यावेळी आझाद सोनार आणि जयराज नवले या होतकरू कलाकारांना पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

पं. विवेक सोनार यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. हिमांशू गिंडे यांनी सादर केलेल्या राग पूरिया धनाश्रीची झलक आणि रागावर आधारित ‘जिवलगा राहिले घर दूर माझे’ या रचनेने रसिकांची मनं जिंकली. तर नील सोनारने पेश केलेल्या राग ‘ललत’ला पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून विशेष दाद मिळाली. कार्यक्रमातील विविध सादरीकरणांना किरण वेहले, गौरव मुरकर, सचिन नखवा, रोहित देव आणि रवी नवले यांची साथ लाभली. कार्यक्रमाची सांगता गुरू पं. विवेक सोनार यांनी राग ‘शुद्ध सारंग’ सादर करत केली, त्यांना पं. मुकुंदराज देव यांनी तबला साथ केली. अभिनेता-निवेदक विघ्नेश जोशी यांनी आपल्या खास शैलीत निवेदन करत कार्यक्रमाची मोट बांधली.

‘गुरु-शिष्य परंपरेचा वारसा केवळ जपण्याबरोबरच तो नव्या पिढीच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न ‘अर्पण’मधून प्रभावीपणे दिसून आला. चार पिढ्यांच्या स्वरांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाने गुरु-शिष्य नात्याला संगीताच्या माध्यमातून भावपूर्ण अभिवादन केलं. “माझा शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिष्य आणि शिष्यांचे शिष्य आज प्रभावी सादरीकरण करताना बघून मला मनस्वी आनंद होत आहे”, अशी भावना पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली. तर ठाणे ही कलाकारांची आणि बासरीची नगरी आहे अशी प्रतिक्रिया अनुराधा चौरसिया यांनी कार्यक्रमप्रसंगी दिली

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech