कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी मोठे राजकीय विधान केले. राज्यात आता एकच शिवसेना असून ती एकनाथ शिंदे यांचीच आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट करत ठाकरे गटाला थेट इशारा दिला. कोल्हापुरात महायुतीकडून आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी ₹ १५०० कोटींचा निधी दिल्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमित शाह यांनी भाषणात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. “घुसखोरांना पाठबळ देणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच “भारत ही धर्मशाळा नाही, जो या देशाचा नागरिक आहे त्यालाच येथे राहण्याचा अधिकार आहे,” असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराचे कौतुक करत “गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात असंभव असे काहीच राहिले नाही,” असे नमूद केले. “पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांना शोधून बाहेर काढले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, जयकुमार गोरे, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने आणि इतर अनेक महायुतीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.