
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमॉरो’ पॅनेलने दणदणीत विजय मिळवत सोसायटीच्या कारभारावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्षपदापासून उपाध्यक्ष, सचिव, छाननी समिती आणि व्यवस्थापन समितीपर्यंत सर्व महत्त्वाच्या पदांवर या पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या निकालामुळे आगामी काळात एशियाटिक सोसायटीच्या प्रशासनात आणि कामकाजात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ५०६ पैकी ३४९ मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना १५७ मते मिळाली. सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत विवेक गणपुले यांनी ३५३ मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सी. एम. पौळ यांना १४९ मते मिळाली. याशिवाय उपाध्यक्षपदाच्या चारही जागांवर चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, रमेश पतंगे आणि संजय देशमुख हे विजयी झाले. छाननी समितीच्या सातही जागा तसेच व्यवस्थापन समितीच्या सहाही जागांवर ‘एशियाटिक टुमॉरो’ पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली.
या निवडणुकीपूर्वी ‘एशियाटिक टुमॉरो’ पॅनेलला विविध क्षेत्रांतील ३० मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला होता. एशियाटिक सोसायटीला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर काढून नवसंजीवनी देण्याची क्षमता या पॅनेलकडे असल्याचा विश्वास या मान्यवरांनी व्यक्त केला होता. या पाठिंब्याच्या पत्रावर संस्कृत आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक डॉ. सिद्धू डांगे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, लेखक अमीष त्रिपाठी, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, आयआयएम मुंबईचे संचालक मनोज कुमार तिवारी, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेते मनोज जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मात्र अत्यंत कमी राहिल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली. सुमारे २,५3० मतदार मतदानासाठी पात्र असतानाही केवळ ५०6 सदस्यांनीच मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच एकूण मतदारांपैकी केवळ सुमारे २० टक्के सदस्यांनी मतदानात सहभाग घेतल. कमी मतदान असूनही ‘एशियाटिक टुमॉरो’ पॅनेलने सर्वच स्तरांवर एकहाती विजय मिळवत एशियाटिक सोसायटीच्या नव्या नेतृत्वावर आपली ठाम छाप उमटवली आहे.