बारामती | प्रतिनिधी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी घोडदौड करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या विजयाने केवळ बारामतीचाच नव्हे, तर दिवंगत अजित पवार यांचा २०१९ मधील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. जानेवारी २०२६ मध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली होती. या जागेसाठी एकूण मतदान सुमारे ५८.१७% इतके झाले होते. या झालेल्या २,२१,७१९ मतदानात, सुनेत्रा पवार यांना पडलेल्या मतांचा वाटा तब्बल ९८.२३% इतका प्रचंड आहे. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय. घुटुकडे आणि इतर अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. अभिजित बिचुकले आणि आणि करुणा मुंडे यांचीही स्थिती अतिशय करुण राहिली.
बारामतीचा हा निकाल राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबाचे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे या बालेकिल्ल्यावरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो. अजित पवारांच्या पश्चात बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांना भरभरून मतदान केल्याचेही दिसून आले. यातून जणू बारामतीच्या जनतेने अजितदादांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
सुनेत्रा पवार यांनी २ लाखाहून अधिक मताधिक्य मिळवत महाराष्ट्राच्या निवडणुकीतील नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
अजितदादांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडीत
बारामतीत आतापर्यंत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १,६५,२६५ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत कोणतीही मोठी राजकीय लढत समोर नसताना हा विक्रम मागे टाकला आहे.
वर्ष | उमेदवार | मताधिक्य
* २०१९ | अजित पवार | १,६५,२६५
* २०२६ (पोटनिवडणूक) | सुनेत्रा पवार | २.१५ लाख (अपेक्षित/अंतिम कल)
राष्ट्रीय विक्रमाच्या उंबरठ्यावर!
भारतात आतापर्यंत विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातील सुनील कुमार शर्मा (२.१४ लाख मते) यांच्या नावावर होता. बारामतीत झालेल्या मतदानाची एकूण संख्या पाहता, सुनेत्रा पवार हे मताधिक्य गाठणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
प्रमुख वैशिष्ट्ये
* श्रद्धांजली म्हणून मतदान: “प्रत्येक मत ही अजितदादांना श्रद्धांजली” या भावनेतून बारामतीकरांनी मतदान केल्याचे पाहायला मिळाले.
* विरोधी पक्षांची भूमिका: या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर मोठ्या पक्षांनी सक्षम उमेदवार न दिल्याने ही लढत तांत्रिकदृष्ट्या एकतर्फी झाली.
* कुटुंबाची साथ: पार्थ पवार आणि जय पवार यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.