शिंदेंची शिवसेना आणखी दुय्यम ठरणार की सत्तेतला समतोल बिघडणार?
१७ जागांची लढाई… पण निकालापेक्षा सत्ता समीकरणांकडे महाराष्ट्राचे लक्ष……!
(अनंत नलावडे)
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ रिक्त जागा आणि नागपूरमधील माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली १ जागा अशा एकूण १७ जागांसाठी झालेली निवडणूक ही केवळ सदस्य निवडण्याची प्रक्रिया राहिलेली नाही. तरं या निवडणुकीतून महायुतीतील खरे शक्तीसंतुलन, भाजपची वाढती पकड आणि मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतरही स्वतःचे राजकीय वजन सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत रंगली आहे.
आधीच बिनविरोध निवडून आलेले ५ उमेदवार
मतदानाआधीच महायुतीने पाच जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना मोठा धक्का दिला.
त्यामध्ये: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी (भाजप), पुणे – विक्रम काकडे, (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार)
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना-शिंदे)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार)
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना-शिंदे)
हे पाचही उमेदवार महायुतीचे असून विरोधकांच्या माघारीमुळे त्यांची बिनविरोध निवड झाली हे विसरता येणार नाही. मात्र या पाचपैकी फक्तं एक जागा बिनविरोध “मोठा भाऊ” म्हणवणाऱ्या भाजप ची आली आहे, तरं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला प्रत्येकी २ जागा लागल्याने विधानपरिषदेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची नक्की भूमिका काय असेल व भाजपही आपली “मोठा भाऊ” ही आपली प्रतिमा कायम ठेऊ शकेल का याकडे राजकीय चाणक्यांचे लक्ष लागले आहे असे म्हटले जाते.
आता राहता राहिला प्रश्न तो उर्वरित १२ जागांचे संभाव्य चित्र विधानपरिषदेत काय राहते याचे…… पण एकूण राजकीय गणिते, स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळ आणि महायुतीच्या एकत्रित ताकदीचा विचार करता सध्याच्या घडीला अंदाजे चित्र आज तरी असे दिसते…..
पक्ष
संभाव्य जागा
भाजप
५ ते ६
शिवसेना (शिंदे)
२ ते ३
राष्ट्रवादी (अजित पवार)
२ ते ३
महाविकास आघाडी
२ ते ४
…………भाजप आघाडीवर का…….?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक प्रतिनिधी आहेत.नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, भंडारा-गोंदिया यांसारख्या मतदारसंघांत भाजपचे संख्याबळ तुलनेने मजबूत मानले जाते.
महाविकास आघाडीची आशा कुठे?
कोल्हापूर, नांदेड, परभणी-हिंगोली, काही मराठवाडा भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस-ठाकरे सेना-शरद पवार गटाला आशा आहे. मात्र स्थानिक पातळीवरील फोडाफोडीमुळे त्यांचे गणित बिघडू शकते.
आता खरी लढाई विधानपरिषदेतल्या पदांची…….!
या निवडणुकीनंतर सर्वात मोठा प्रश्न असेल तो म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा. तरं सध्या हे पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडे असल्याने ते त्यांच्या उरलेल्या राजकीय प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. मात्र महायुतीत सर्वाधिक सदस्यसंख्या भाजपकडे गेल्यास भाजपकडून “संख्याबळाच्या आधारावर उपसभापतीपद आमचे” असा दावा पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. कारण “लोकसभा, विधानसभा, महापालिका, परिषद… सर्वत्र सर्वात मोठा पक्ष आम्ही. मग उपसभापतीपद दुसऱ्याकडे का?” हा प्रश्न भाजपचे नेते बंद दाराआड विचारू लागल्याची चर्चा आहे.
शिंदेंसाठी ही निवडणूक ‘अस्तित्वाची परीक्षा’………!
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेना मोठी भागीदार होती.
२०२२ मध्ये बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.२०२४ नंतर भाजप पुन्हा केंद्रस्थानी आला. मात्र २०२६ मध्ये परिस्थिती अशी आहे की,मुख्यमंत्री भाजपचे
विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष
महापालिकांत भाजपचा प्रभाव वाढतोय
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची पकड मजबूत अशा स्थितीत विधानपरिषदेतही भाजपचे वर्चस्व वाढले तर शिंदे गटाची भूमिका “सत्तेतील भागीदार” वरून “कनिष्ठ सहकारी” इतकी मर्यादित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
यामागे भाजपचा अंतिम उद्देश काय…..?
राजकीय जाणकारांच्या मते या निवडणुकीचा खरा संदेश असा असू शकतो:
“महायुती आहे, पण केंद्रबिंदू भाजपच आहे.”
जर निकालानंतर भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या तर विधानपरिषदेतही त्यांचा प्रभाव निर्णायक होईल. त्यानंतर उपसभापतीपद, समित्यांची अध्यक्षपदे आणि सभागृहातील महत्त्वाची स्थाने यांवर भाजप अधिक आक्रमकपणे दावा करू शकतो. म्हणून त्यातून राजकीय पंडित आजघडीला बोलत आहेत की ही निवडणूक १७ सदस्यांची असली तरी प्रत्यक्षात ती तीन प्रश्नांची आहे….
महायुतीत खरा ‘बिग बॉस’ कोण?
शिंदे गटाचे स्वतंत्र राजकीय वजन उरले आहे का?
विधानपरिषदेत भाजप आता पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणार का?
आता प्रत्यक्षात २२ जूनला मतमोजणी होईलच. पण निकालापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे तीही की,विधानपरिषदेची ही निवडणूक म्हणजे जागांची नाही, तर महायुतीतील सत्ता आणि प्रतिष्ठेच्या नव्या युद्धाची नांदी ठरत आहे तूर्तास इतकेच…..!