तक्रारीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार वकील रिंकी चट्टोपाध्याय सिंह यांनी सिलीगुडी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एका वकिलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. ही तक्रार २० मे रोजी वकील रिंकी चट्टोपाध्याय सिंह यांनी सिलीगुडी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु, सुरुवातीला पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता आणि वारंवार पाठपुरावा केल्यानंतरच एफआयआर स्वीकारण्यात आल्याचे रिंकी चटोपाध्याय सिंह यांनी सांगितले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या २ वक्तव्यांमुळे भारतासह जगभरातील लाखो सनातनी हिंदूंच्या भावना आणि श्रद्धेला गंभीर धक्का बसला. यापैकी पहिले वक्तव्य २०२५ मधील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान करण्यात आले होते, तर दुसरे विधान विधानसभा निवडणुकांपूर्वी धर्मतळा येथे झालेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वकिलाने या वक्तव्यांना असंवैधानिक आणि भडकाऊ असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराने म्हटले की, बॅनर्जी यांनी असे म्हटले होते की, एखाद्या विशिष्ट समुदायाने इच्छा व्यक्त केली तर ते ५ मिनिटांत इतरांना ‘संपवू’ शकतात. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा केली जात नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
सिलीगुडी पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून एफआयआरमध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ (गुन्हेगारी धमकी), ३५२(शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान), ३५३ (खोटी माहिती पसरवणे), ३५४ (दैवी रागाची भीती दाखवून धमकावणे), ३५६ (गुन्हेगारी मानहानी) आणि २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण कृत्य) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.