संथ कामांवर नाराजी, दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
(अनंत नलावडे)
मुंबई : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची उलटी गिनती आता सुरू असताना तब्बल ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांच्या संथ गतीवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गांभीर्याने घेत शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. कारण हा असल्याने राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी संबंधित यंत्रणांची कानउघाडणी केली. त्याचवेळी त्यांनी पुढील एका महिन्यात प्रत्यक्ष आणि गुणात्मक प्रगती दिसलीच पाहिजे, अन्यथा जबाबदार अधिकारी आणि कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असाही ठोस व स्पष्ठ इशारा दिला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित गती नसल्याचे निदर्शनास आणत त्यांनी महिनाभरानंतर पुन्हा प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुढील बैठकीपूर्वी प्रशासनासमोर कामे प्रत्यक्ष मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मार्च २०२७ची अंतिम मुदत
भूसंपादन, नाशिक रिंग रोड, साधुग्राम, प्रमुख रस्ते आणि नागरी सुविधा मार्च २०२७पर्यंत पूर्ण करून एप्रिल २०२७मध्ये भाविकांच्या वापरासाठी उपलब्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यातही शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि प्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच वेळापत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले. महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, गॅस कंपनी तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, यावरही त्यांनी भर दिला. “एक विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवेल, अशी परिस्थिती चालणार नाही,” असे स्पष्ट करत सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
१२ कोटी भाविकांसाठी ‘हायटेक’ तयारी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज गृहित धरून वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. नाशिक रिंग रोड, साधुग्राम, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेस आणि मोठ्या प्रमाणावर पार्किंग सुविधा उभारण्याच्या कामांना वेग देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी व सुरक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
स्वच्छता आणि रोजगारालाही प्राधान्य
प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि हरित कुंभमेळ्यासाठी हजारो तात्पुरती शौचालये, कचराकुंड्या, बदल खोल्या आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. स्थानिक युवकांना पर्यटन, आदरातिथ्य, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे. बैठकीतून स्पष्ट झालेला संदेश असा की, कुंभमेळ्याच्या तयारीचा आराखडा आता कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कामांच्या वेगातून दिसला पाहिजे. पुढील महिनाभरात प्रगती न दिसल्यास प्रशासनाला कठोर उत्तरदायित्वाला सामोरे जावे लागू शकते.