(अनंत नलावडे)
मुंबई : ‘पक्षात कोणतीही गटबाजी नाही’, ‘सर्व निर्णय सामूहिक चर्चेने होतात’ आणि ‘मला रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही’ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी शुक्रवारी जाहीर पत्रकार परिषदेत केलेली ही वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न मानली जात असतानाच, पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून मात्र नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. विशेषतः निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्यासोबतच्या तब्बल सहा तासांच्या बैठकीनंतर या चर्चांना वेग आला आहे.
प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे नसल्याचे खा.तटकरे यांनी स्पष्ट केले. ‘एखादी भेट झाली म्हणजे लगेच नियुक्ती झाली, असा अर्थ काढणे योग्य नाही,’ असे सांगत त्यांनी या चर्चांना फारसे महत्त्व दिले नाही.मात्र, त्याचवेळी ‘मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे. मला रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही,’ असे सांगत त्यांनी बाह्य राजकीय रणनीतीवर आपली भूमिकाही स्पष्ट केली.
तटकरे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा दाखला देत जनतेचा कल जाणून घेण्यासाठी सर्व्हेची आवश्यकता नसल्याचे सांगितले.शरद पवार, अजित पवार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक वर्षे काम केले असून,राज्याचा कानाकोपरा आपण आठ वेळा पालथा घातल्याचे त्यांनी नमूद केले.२०१९ मधील पक्षाच्या यशामागे कोणताही रणनीतीकार नव्हता, तर कार्यकर्त्यांची मेहनत होती, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
आता जर खा. तटकरे यांच्या म्हणण्यानुसार जर खरंच सुनील तटकरे यांनी आठ वेळा राज्याचा कानाकोपरा पालथा घातल्याचे सांगत पक्षाला रणनितीकराची गरज नाही असे जे वक्तव्य केले ते तत्कालीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पुण्यातील नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला रणनितीकार नेमले त्यावेळी त्यांनी कोणतेही वक्तव्य सोडा पण अजितदादांकडे आपले आजच्या सारखे स्पष्ट मत असेच ठामपणे का मांडले नाही असे परखड सवाल पक्षातीलच काही अन्य ज्येष्ठ नेते खाजगीत बोलून दाखवत आहेत.
मग बंद दाराआड नेमकं काय……..?
दरम्यान, पक्षाच्या आगामी निवडणूक तयारीच्या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील संघटनात्मक रचना, नेतृत्वाची कार्यपद्धती आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या काही बैठकींमध्येही संघटनात्मक बदलांचा मुद्दाही चर्चेत आल्याचे सांगितले जाते. मात्र प्रामुख्याने सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाला आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अधिक आक्रमकपणे मैदानात उतरायचे असेल, तर संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे बैठकीत व्यक्त करण्यात आले. विशेषतः राज्यातील नेतृत्व आणि स्थानिक संघटन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे आग्रही मतही ठामपणे मांडण्यात आल्याचीही एक चर्चा आहे.या बैठकीला खुद्द पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते. तरं जय पवार यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रदेशाध्यक्षपदावर प्रशांत किशोर यांचा ‘फीडबॅक’……?
मात्र आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा ठरला आहे. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रभावीपणे काम करण्यासाठी राज्यातील नेतृत्वाने एकसंघपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी बैठकीत व्यक्त केले.भविष्यातील निवडणुकांसाठी अपेक्षित रणनीती प्रभावीपणे राबवायची असेल, तर आताच प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता भासू शकते, असा सूर बैठकीत उमटल्याचेही सांगितले जाते.मात्र, या बैठकीत नेमका असा निर्णय झाला का, प्रदेशाध्यक्ष बदलाचा प्रस्ताव औपचारिकपणे मांडण्यात आला का किंवा प्रशांत किशोर यांची पक्षासाठी अधिकृत भूमिका निश्चित झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘मला हटवण्याबाबत मीच कसे उत्तर देणार?’
प्रदेशाध्यक्षपदावरून आपल्याला हटवले जाणार असल्याच्या चर्चेबाबत तटकरे यांनी थेट उत्तर देणे टाळले. ‘मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार आहेत, याचे उत्तर मीच कसे देणार?’ असा प्रतिप्रश्न करत त्यांनी या चर्चेवर अधिक भाष्य करण्याचे टाळले असले तरी तटकरे यांचा ‘रणनीतीकार नको’ हा पवित्रा आणि पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून समोर येत असलेली नेतृत्वबदलाची चर्चा यातील विरोधाभास राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. अशात राष्ट्रवादीत ‘गटबाजी नाही’ असे प्रदेशाध्यक्ष सांगत असले, तरी दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक फेरबदलाची गरज व्यक्त होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.त्यामुळे सध्या प्रश्न केवळ प्रशांत किशोर पक्षाचे रणनीतीकार होणार की नाही, एवढाच राहिलेला नसून राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाची पुढची दिशा कोण ठरवणार? हा खरा राजकीय सवाल ठरला आहे.