मुंबई : जागतिक संकटाच्या काळात देशातील अर्थव्यवस्था रुळावर राहावी. देशापुढे संकट निर्माण होऊ नये, यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी काही उपाय सुचवले आहेत, जर विरोधी पक्षातील लोकांना हे उपाय पटत नसतील तर त्यांनी किमान याचे थट्टा करू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, “जेव्हा एखाद्या जागतिक संकटाचा काळ असतो, त्यावेळी देशाचे पंतप्रधान जर एखादा उपाय सुचवत असतील तर तो सकारात्मकतेने घेतला पाहिजे. जगातील अनेक देशांमध्ये परिस्थिती खूपच खराब आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन झाला आहे.
काही देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव ४५०-५०० रुपयांपर्यंत ही वाढवले गेले आहेत. तीन तीन दिवस पेट्रोल मिळत नाही. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर शक्य त्या पद्धतीने हे उपाय अंमलात आणले पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने देखील सुरक्षेच्या मुद्द्यावर असो, किंवा परदेश प्रवासाबाबत असो किंवा परकीय चलनाबाबतच्या धोरणाबाबत असो, जे खर्च होत आहेत ते कमीत कमी कसे होतील याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबतची एक बैठक आम्ही बोलावली आहे. निश्चितपणे पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाने अशाप्रमाणेच महाराष्ट्रदेखील काम करणार आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली जीवनशैली थोड्या थोड्या पद्धतीने जरी बदलली तरीही त्यांनी देशाला खूप मदत होऊ शकेल. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे. मला खात्री आहे की आपले देशवासी मदतच करतील.
विरोधकांनी कितीही थट्टा मस्करी केली, तरीही वैश्विक संकटाच्या काळात जर आपण देशाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो नाही, तर ते योग्य होणार नाही. महाराष्ट्र सरकारने अनेक बदल केले आहेत. मंत्र्यांचे ताफे कमी करण्यात आले आहेत. अधिकारी आणि मंत्र्यांच्या गाडी वापरावर निर्बंध आणले आहेत. ज्या ज्या गोष्टीत परकीय चलन वापरले जाते, त्याची खपत कशी कमी होईल यावरही प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने स्वदेशी गोष्टींचा कशाप्रकारे वापर वाढवता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याकडे सहा महिने मागितले आहेत, तेही त्यांना न देणे हे अयोग्य ठरेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.