सरकारविरोधी पोस्ट हटवल्याचा इन्स्टाग्रामवर आरोप

0

अभिजीत दीपकेकडून सेन्सॉरशिपवर टीका

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून सरकारविरोधी पोस्ट हटवल्या जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक सदस्य अभिजीत दीपके याच्यासह अनेकांनी या प्रकारावर टीका करत ही कृती म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अभिजीत दीपके याने बुधवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका करणाऱ्या हजारो पोस्ट दररोज हटवल्या जात असल्याचा आरोप केला. मात्र, अशा कारवाईमुळे लोकांच्या प्रश्नांना आळा बसणार नसल्याचे त्याने म्हंटले आहे. इन्स्टाग्राम हे नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी उपलब्ध असलेले केवळ एक माध्यम आहे. या प्रश्नांची कारणे सोशल मीडियाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे पोस्ट किंवा खाती हटवून नागरिकांच्या मनातील प्रश्न संपणार नाहीत, असे दीपकेने नमूद केले. सरकारने सेन्सॉरशिपचा मार्ग अवलंबल्यास नागरिकांमधील अविश्वास आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांने दिला.

वरुण ग्रोव्हर यांच्या व्यंगात्मक कवितेची पोस्ट हटवल्याचा दावा
दरम्यान, सरकारवर टीका करणाऱ्या इतर व्यक्तींनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट रोखल्या किंवा हटवल्या जात असल्याचे आरोप यापूर्वी केले आहेत. व्यंग्यकार आणि गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी इन्स्टाग्रामवरून त्यांच्या एका कवितेची पोस्ट हटवण्यात आल्याची तक्रार केली आहे. ही कविता केंद्र सरकारच्या ‘२०४७ विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित व्यंगात्मक रचना होती.ग्रोव्हर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर केला. संबंधित पोस्टमधील कवितेच्या संगीतबद्ध आवृत्तीवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech