४९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वंदना सूर्यवंशींची विभागीय चौकशी सुरू

0

मुंबई : सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी व म्हाडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या वंदना सूर्यवंशी यांच्यावर विभागीय चौकशीला सुरुवात झाली आहे. मुंबईत तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी असताना राज्य सरकारला २०१४ मधील एका दस्त नोंदणी प्रकरणात ४९ कोटी ३१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप वंदना सूर्यवंशी यांच्यावर आहे. याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर वंदना सूर्यवंशी यांच्याविरोधात विभागीय चौकशीला सुरुवात झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तत्कालीन मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना वंदना सूर्यवंशी यांनी मुद्रांक अधिनियम तरतुदींनुसार बाजारमूल्य निश्चित करणे आवश्यक होते. मात्र वंदना सूर्यवंशी यांनी बाजारमूल्याचे चुकीचे मूल्यांकन केल्यामुळे शासनाला तब्बल ४९.३१कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी कर्तव्यावर असताना पदाचा गौरवापर आणि शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचा त्यांचावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच वंदना सूर्यवंशी यांनी बाजूरमूल्याचे चुकीचे मुल्यांकन करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर आता विभागीय चौकशीला सुरुवात झाली आहे.

पुण्यातील नोंदणी महानिरिक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाने मुंबईतील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता सदर प्रकरणात ६७ कोटी ७४ लाख रुपये मुद्रांक शुल्क कमी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, मुद्रांक अधिनियमाच्या कलम ५३ अ नुसार पुनर्विलोकनानंतर ४९.३१कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हे प्रकरण समोर आल्यानंतर आता वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे याच प्रकरणात तत्कालिन सहाय्यक नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्याही विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech