– ठाकरे-फडणवीस विमानप्रवास
मुंबई : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करत राजकीय प्रतिक्रिया दिली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानप्रवासादरम्यान उच्चस्तरीय चर्चा झाल्याचा सूचक दावा केला होता. त्या चर्चेचे तपशील योग्य वेळी समोर येतील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय चर्चांना वेग आला.
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. “विमानापेक्षा इमान महत्त्वाचे असते. २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र प्रवास करण्याचे तिकीट दिले होते. मात्र त्यावेळी वेगळा राजकीय निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काँग्रेससोबतचा प्रवास सुरू झाला. आता विविध प्रयत्न सुरू असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मधील अनुभवातून धडा घेतला आहे,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास केला. उद्धव ठाकरे हे पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते, तर देवेंद्र फडणवीस पुण्यातील कार्यक्रम आटोपून नागपूरला जात होते. विमानात प्रवेश करताना दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कीलपणे, “आपण तिघे एकत्र आलो, हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे,” अशी टिप्पणी केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची औपचारिक विचारपूस केली. मात्र संपूर्ण विमानप्रवासात कोणतीही राजकीय किंवा वैयक्तिक चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित लोकसभा मतदारसंघांमध्ये डॅमेज कंट्रोल दौरा सुरू केला आहे. २७ जूनपासून यवतमाळ-वाशीम दौऱ्याला सुरुवात झाली असून, त्याचवेळी झालेल्या या विमानप्रवासामुळे आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रियांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.