नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडी आघाडीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या तिघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, आम्ही नरेंद्र मोदी यांना कुठेही जाऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पाटणा येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला असतानाच राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. खरगे यांनी, ‘मोदींचा बापही जाणार,’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.राहुल गांधी म्हणाले, “अमित शाह म्हणाले की नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत. मात्र, मी सांगतो की नरेंद्र मोदी कुठेही जाऊ शकत नाहीत. त्यांना जायचे असले तरी आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आम्ही तुमच्यासमोर उभे राहू. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे पळून जाण्याचा विचारही करू नका.”
राहुल गांधी यांनी मतदारयादीतील नावांमध्ये झालेल्या कथित फेरफाराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर साडेतेरा कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. प्रत्येक सात मतदारांमागे एका मतदाराचे नाव काढण्यात आले. म्हणजेच १५ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली. २०२४ च्या निवडणुकीत विजयातील फरक केवळ तीन टक्के होता. त्यानंतर १५ टक्के मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. याचा अर्थ २०२४ ची निवडणूक अवैध होती. ती मतचोरीची निवडणूक होती.” विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटवले जाईल आणि त्यांना तुरुंगात जावे लागेल. ही साधी चोरी नाही. एखाद्याने दुकानातून एखादी छोटी वस्तू चोरली, तशी ही सामान्य चोरी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही मोदी, शाह किंवा ज्ञानेश कुमार यांचा द्वेष करत नाही. मात्र, तुम्ही देशाच्या संविधानावर, देशाच्या आत्म्यावर आणि लोकशाहीवर हल्ला केला आहे. हे आम्ही कदापि स्वीकारणार नाही. मोदी, शाह, ज्ञानेश कुमार किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यापैकी कोणीही असो, आम्ही त्यांना मारणार नाही किंवा कापणार नाही. आम्हाला प्रेमाच्या मार्गाने काम करायचे आहे. देश आज सांगत आहे की, आम्हाला द्वेष नको, तर प्रेम हवे आहे. देशात आता ‘मोहब्बत की दुकान’ सुरू होणार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “बिचारे ज्ञानेश कुमार रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत. त्यांनी देशातील सर्वांत मोठा गुन्हा केला आहे. त्यांनी देशाचा गळा घोटला आहे. त्यामुळेच त्यांना रात्री झोप लागत नाही.”