एमआयडीसीला प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे थेट आदेश……!
आरक्षित जागेच्या प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आक्रमक भूमिकेत……
(अनंत नलावडे)
मुंबई : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी चिंचवडमधील पर्यटन केंद्रासाठी आरक्षित जागेवर स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा वारसा जपणारी भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे रेटत प्रशासनाला थेट आदेश गुरुवारी येथे दिले.त्याचवेळी या जागेवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सुरू केलेले प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश देत बनसोडे यांनी प्रशासन आणि एमआयडीसी समोर कठोर भूमिका घेतल्याने या विषयाला आता स्पष्ट राजकीय रंग चढला आहे.
आज विधानभवनातील आपल्या दालनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत अण्णा बनसोडे यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ३०१ ही जागा पर्यटन केंद्रासाठी राखीव असून जुन्या तसेच नव्या विकास आराखड्यातही हे आरक्षण कायम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असताना एमआयडीसीकडून प्लॉटिंग करून खाजगी उद्योजकांना भूखंड विक्रीचे नियोजन केल्याची माहिती समोर आल्याने बनसोडे यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे विशेष लक्ष लागले आहे.राज्याच्या विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याची, विकासदृष्टीची आणि जनसंपर्काची आठवण पुढील पिढ्यांसाठी जपली जावी, या उद्देशाने ‘अजितसृष्टी’ उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला नवे पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीच्या नियोजनावरही थेट आक्षेप…
बैठकीत अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकास आराखड्यातील आरक्षणाला बाधा पोहोचवणारे कोणतेही नियोजन स्वीकारले जाणार नाही. पर्यटन केंद्रासाठी राखून ठेवलेल्या जागेचे औद्योगिक किंवा व्यावसायिक प्लॉटिंगमध्ये रूपांतर करणे हे शहर नियोजनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारे आहे. त्यामुळे एमआयडीसीने केलेले प्लॉटिंगचे नियोजन तात्काळ थांबवावे आणि आरक्षण कायम ठेवावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती असून शाहूनगर भागात एमआयडीसीने यापूर्वीच कामगारांसाठी गृहनिर्माण योजना उभारली आहे.त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही आणि विकास आराखड्याचा मूळ हेतू अबाधित राहील, यासाठी पर्यटन केंद्राचे आरक्षण कायम ठेवणे आवश्यक असल्याचे बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
महापालिकेलाही थेट सूचना……
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संबंधित जागेचे पर्यटन केंद्राचे आरक्षण अबाधित ठेवावे, एमआयडीसीचे प्लॉटिंग त्वरित थांबवावे आणि ‘अजितसृष्टी’ उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना उपाध्यक्षांनी बैठकीत दिल्या. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चिंचवडमधील हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.स्व.अजित पवार यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’च्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा वारसा जतन करण्याबरोबरच विकास आणि स्मृती यांचा संगम साधण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा विषय केवळ विकास आराखड्यापुरता मर्यादित न राहता आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत. या बैठकीस पिंपरी-चिंचवड एमआयडीसीचे मुख्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.