राज्यासह १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

0

अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर

मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागांमध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, १९ एप्रिलपर्यंत पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशामध्ये १७ ते १९ एप्रिल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि रायलसीमामध्ये १७ व १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आयएमडीच्या मते, वायव्य भारतावर पश्चिमी वाऱ्यांसह एक पश्चिमी प्रणाली सक्रिय आहे. १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळे वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.

ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालयमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशीच हवामान परिस्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये राहील. अरुणाचल प्रदेशात १६ ते १९ एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्हा प्रशासन सज्ज
राज्यातील उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. अकोल्याचा पारा ४४ अंशांच्या पार गेला आहे. अकोला राज्य आणि देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी शहर बनलं आहे. त्यामुळे उन्हाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. उन्हापासून वाचण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांची तातडीची बैठक घेतली आहे. वाढत्या उन्हाचा आणि उष्माघाताचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३७ खाटा राखीव ठेवण्यात आल्यायेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech