नववीच्या अभ्यासक्रमात आणीबाणीचा समावेश स्वागतार्ह; विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव होणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने नववी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात १९७५ च्या आणीबाणीचा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाही इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची माहिती असणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, आणीबाणीचा काळ त्यांनी विद्यार्थी अवस्थेत अनुभवला आहे. त्या काळात प्रसारमाध्यमांवर निर्बंध होते आणि वृत्तपत्रांमध्ये मुक्तपणे बातम्या प्रकाशित होत नव्हत्या. सार्वजनिक ठिकाणी काही लोक एकत्र आल्यास त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. तसेच सावकारीविरोधात किंवा कामगारांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती, अशी आठवण डॉ. गोऱ्हे यांनी सांगितली.

काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू करून देशात एक प्रकारची हुकूमशाही व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे त्या काळातील परिस्थिती, लोकशाही संस्थांवरील परिणाम आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आलेली बंधने यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना लोकशाही, संविधान आणि नागरिक स्वातंत्र्य यांचे महत्त्व समजण्यासाठी आणीबाणीच्या कालखंडाचा अभ्यास उपयुक्त ठरेल, असे मतही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech