भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक ठरणार – मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई : सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी. उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायप्रस – भारत बिझनेस फोरममध्ये सांगितले. सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस, आयोजित या फोरममध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सह सचिव जय प्रकाश शिवहरे, फिक्कीचे (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) उपाध्यक्ष विजय संकर, सीआयआयचे (Confederation of Indian Industry) अध्यक्ष बी.थियागर्जन, सायप्रसच्या चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्टाव्रोस स्टाव्रू तसेच इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष इव्हजेनिअस इव्हजेनिऊ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांचे संबंध केवळ भौगोलिक मर्यादांवर आधारित नसून लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय अस्तित्व या समान मूल्यांवर उभे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र हे आज ६६० अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे ३० टक्के आणि परकीय गुंतवणुकीत ४० टक्के वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र ९३ गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी ५२ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांतून निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची ताकद असून महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक भविष्यासाठी प्रवेशद्वार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील, असेही मुख्यमंत्री यांनी नमुद केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहे. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार- राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस
भारत आणि सायप्रस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ स्थापन करण्यात येत आहे. हे केंद्र येत्या १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून भारतीय कंपन्यांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचे सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी या फोरममध्ये केली. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंधांना “स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चे स्वरूप प्राप्त झाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या सायप्रस दौऱ्यानंतर या संबंधांना नवी गती मिळाल्याचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech