नवी दिल्ली : भारत नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहील आणि मानवतेच्या मूल्यांना सर्वाधिक प्राधान्य देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत स्पष्ट केले. फ्रान्समधील एव्हियन-ले-बँस येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन संबंध आणि परस्पर सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि युक्रेन यांच्यातील संवाद आणि सहकार्य सातत्याने वाढत आहे. हे वाढते सहकार्य दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील संबंधांमध्ये स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, चर्चेदरम्यान दोन्ही देशांतील सहकार्याच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच युद्धापूर्वीच्या पातळीवर द्विपक्षीय व्यापार पुन्हा पूर्ववत करण्याबाबत भारत आणि युक्रेन यांच्यात एकमत झाले आहे. भारत नेहमी शांततेच्या बाजूने राहील आणि मानवतेच्या मूल्यांना सर्वोच्च स्थान देईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट संवाद आणि राजनैतिक मार्गानेच व्हावा, अशी भूमिका भारत सातत्याने मांडत आला आहे. संघर्षाचे निराकरण केवळ चर्चेच्या माध्यमातूनच शक्य असल्याचा नवी दिल्लीचा विश्वास आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीला सकारात्मक संबोधले. भारत आणि युक्रेन यांच्यात सहकार्याच्या अमर्याद संधी असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देश आधीपासूनच अनेक संयुक्त प्रकल्पांवर काम करत असून, त्यांना अधिक बळकटी देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
झेलेन्स्की म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना युक्रेनसोबत परस्पर हिताचे संबंध अधिक दृढ करण्याची इजच्छा आहे आणि ही भागीदारी दोन्ही देशांच्या नागरिकांना अधिक सक्षम बनवू शकते. औद्योगिक क्षेत्रासह अनेक प्रकल्पांमध्ये दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जाऊ शकतात. यासाठी दोन्ही देशांची पथके सर्व बाबींवर सविस्तर काम करणार आहेत.पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील शेवटचा थेट संवाद ३० ऑगस्ट २०२४ रोजी झाला होता. त्यावेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दूरध्वनीद्वारे पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती.