राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात भुजबळ-तटकरेंच्या फटक्यांनी रंगले राजकीय मैदान
(अनंत नलावडे)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाच्या भविष्यासोबतच भूतकाळातील राजकीय डावपेच, सत्तेची समीकरणे आणि नेत्यांमधील मिश्किल टोलेबाजी यांचीही जोरदार चर्चा रंगली. ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी एका जुन्या राजकीय निर्णयाचा संदर्भ देत “तो निर्णय झाला नसता तर महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मिळाला असता,” असा गौप्यस्फोट केला, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भुजबळांच्या ‘कबड्डी’ प्रेमावर खुमासदार टोलेबाजी करत सभागृहात हास्यकल्लोळ उडवला.
भुजबळ यांनी आपल्या भाषणात राज्याच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देताना सांगितले की, काँग्रेसमधील फुटीनंतर विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय झाला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळण्याची संधी होती. “त्या वेळी काही राजकीय निर्णय वेगळे झाले असते तर आज महाराष्ट्राचा राजकीय इतिहासही वेगळा असता,” असे सूचक विधान करत त्यांनी जुन्या सत्तासमीकरणांना पुन्हा नव्याने उजाळा दिला.
मात्र या गंभीर राजकीय चर्चेलाही तटकरेंनी आपल्या खास शैलीत हलकेफुलके वळण दिले.भुजबळ यांनी स्वतःला ‘कबड्डीचा खेळाडू’ संबोधल्यानंतर तटकरेंनी चिमटा काढत, “भुजबळ हे कबड्डीतील मुरब्बी खेळाडू आहेत.पण त्यांचे वैशिष्ट्य असे की ते ‘आऊट’ झाले तरी पहिल्याच बाकावर जाऊन बसतात, कारण पुन्हा मैदानात परतण्याचा मार्ग त्यांना चांगलाच ठाऊक असतो,” असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
यावरच न थांबता तटकरेंनी भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक करत, “राजकारणाच्या पटावर कोणाला कधी ‘चेकमेट’ करायचे हे त्यांना उत्तम प्रकारे ठाऊक असल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळेच अनेकदा ते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दोन पावले पुढे असतात,” अशी मिश्किल टिप्पणीही केली.
दरम्यान, राष्ट्रवादीतील नेतृत्व, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही दोन्ही नेत्यांनी स्पष्ट संदेश दिला.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संघटनेचा उल्लेख करत तटकरेंनी “आम्ही फक्त कबड्डीच नाही तर ‘खो-खो’ही खेळतो. कोणाला कधी ‘खो’ द्यायचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,” असे म्हणत पक्ष संघटनेच्या राजकीय चातुर्याचाही कटाक्षाने उल्लेख केला. मगं भुजबळ यांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देताना पक्षापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे स्पष्ट केले. पदे ही क्षणभंगुर असतात, मात्र पक्षनिष्ठा कायम राहिली पाहिजे, असे सांगत त्यांनी मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत, असे खुले आवाहन केले.
मात्र एकीकडे ‘मिस झालेल्या मुख्यमंत्रीपदाची’ चर्चा, दुसरीकडे कबड्डी-खो-खोच्या रूपकातून रंगलेली टोलेबाजी आणि आगामी राजकीय समीकरणांचे सूचक संकेत यामुळे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा हा केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता राज्याच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. भुजबळांच्या गौप्यस्फोटाने भूतकाळातील सत्तेच्या शक्यता पुन्हा चर्चेत आल्या, तर तटकरेंच्या मिश्किल फटक्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणालाही वेगळीच रंगत आणली……