आमदारांच्या सुरक्षेवरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींना मिळत असलेल्या कथित ‘बिश्नोई गँग’च्या धमक्यांचा मुद्दा गुरुवारी थेट विधानसभेत घुमला आणि आमदारांच्या सुरक्षेवरून सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याचा मुद्दा ऐरणीवर आणत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.त्यामुळे कायदा-सुव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिवेशनातील प्रमुख राजकीय विषय ठरला.
साजिद पठाण यांना वारंवार धमक्या येत असताना त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने अपेक्षित गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले. जर “एका चित्रपट दिग्दर्शकाला २५ सुरक्षारक्षक मिळू शकतात, मग जनतेने निवडून दिलेल्या आमदाराच्या सुरक्षेबाबत दुजाभाव का….? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.पठाण यांना तातडीने अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.
याच चर्चेत नाना पटोले यांनी सुद्धा राज्यातील लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या धमक्यांचा मुद्दा अधिक व्यापक स्वरूपात मांडला.”बिश्नोई गँग” सारख्या गुन्हेगारी टोळ्यांकडून आमदारांना धमक्या मिळत असताना त्यांची सुरक्षा अपुरी असल्याचा गंभीर दावाही त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी शासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार करण्याची गरज असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असल्याचे स्पष्ट करत, संबंधित प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन सभागृहात दिले.
मात्र जर लोकप्रतिनिधींनाच सातत्याने धमक्या मिळत असतील, तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नेमकी किती सक्षम आहे, असा राजकीय प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.त्यामुळे साजिद पठाण यांना मिळालेल्या धमक्यांचे गांभीर्य, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा आणि त्यावरून सरकार-विरोधकांमध्ये रंगलेला संघर्ष अधिवेशनातील महत्त्वाचा राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे.