चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील दुसऱ्या एका कारखान्यातही स्फोट झाला होता.हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याचे अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
कारखान्यात कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. आग वेगाने पसरली आणि अनेक जण आतच अडकून पडले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले आणि बचावकार्य हाती घेतले.अग्निशमन आणि बचाव विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला असून स्फोट नेमका कसा झाला याची चौकशी सुरू केली आहे.
या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाला मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रपतींनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत हा अपघात अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दोन्ही नेत्यांनी या कठीण काळात प्रभावित कुटुंबीयांसोबत उभे राहण्याचा विश्वास दिला.