माथेरान पर्यटन धोक्यात? रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

रायगड : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानला दरवर्षी सुमारे ८ ते १० लाख पर्यटक भेट देतात. निसर्गरम्य दऱ्या, हिरवागार परिसर आणि डोंगरातून धावणाऱ्या मिनी ट्रेनचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे येत असतात. मात्र सध्या माथेरानच्या रेल्वे सेवेत झालेल्या कपातीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी नेरळ–माथेरान–नेरळ या मार्गावर दररोज ४+४ अशा एकूण ८ ट्रेन फेऱ्या चालत होत्या, तर वीकेंडला ६+६ अशा १२ फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता या मार्गावर फक्त २+२ अशा एकूण ४ ट्रेन धावत आहेत. या ट्रेनची आसन क्षमता केवळ ११० सीट इतकी असल्याने अनेक पर्यटकांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे डोंगर-दऱ्यांमधून धावणाऱ्या या ऐतिहासिक ट्रेनचा आनंद घेण्यापासून पर्यटक वंचित राहत आहेत.

दस्तुरी नाक्याजवळील अमन लॉज रेल्वे स्थानक ते माथेरान या मार्गावर मात्र दररोज ८+८ अशा १६ शटल ट्रेनच्या फेऱ्या सुरू आहेत. तरीही माथेरानमध्ये पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
माथेरान रेल्वे स्थानक ते कार पार्किंग व टॅक्सी स्टँडपर्यंत ये-जा करण्यासाठी सध्या केवळ २५ ई-रिक्षा उपलब्ध आहेत. पर्यटकांची संख्या मोठी असल्याने तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमधील ९४ हातरिक्षा परवानाधारकांना स्वतःच्या मालकीच्या ई-रिक्षा चालविण्याची कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या माथेरानमध्ये हातरिक्षाचे भाडे ५०० ते ६०० रुपये, तर घोड्याचे भाडे ३०० ते ३५० रुपये आकारले जाते. मिनी ट्रेनचे फर्स्ट क्लास तिकीट ९५ रुपये तर सेकंड क्लास तिकीट ५५ रुपये आहे. पर्यटन वाढीसाठी रेल्वे फेऱ्या वाढविणे आणि ई-रिक्षा सेवेला परवानगी देणे गरजेचे असल्याचे मत पर्यटक व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech