नसरापूर प्रकरण : शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाबी उघड

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. १ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा, विशेषतः फाशी देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नवले पूल परिसरात नसरापूरच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, ससून रुग्णालय प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेच्या तोंडात मोजा कोंबण्यात आला होता, तसेच तिच्या छातीवर जखमेचे ठसे आढळले. या निष्कर्षांवरून आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी आणि पीडितेला प्रतिकार करता येऊ नये म्हणून अमानुष कृत्य केले असल्याचे दिसून येते.

ही बालिका आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नसरापूर येथे आजोळी आली होती. खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन अत्याचार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech