राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीचे ६ दिग्गज नेते अमित शाहांच्या भेटीला

0

– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा- पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत – सुनेत्रा पवार

मुंबई :  महाराष्ट्रातील आगामी राजकीय रणनीती आणि मंत्रिमंडळातील खातेवाटपात स्थान मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणे, संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा करणे आणि आगामी राजकीय रणनीती आदी मुद्यांवर चर्चा झाल्याचमी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या आणि पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य, बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

उमेश पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, अमित शाह यांच्यासोबत झालेली ही बैठक अचानक ठरलेली नव्हती तर तिचे नियोजन आधीच झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी स्वतः दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच बैठकीदरम्यान, पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेईल, असे सुनेत्रा पवार यांनी शाह यांना सांगून ही वेळ मागून घेतली होती. या बैठकीत नेत्यांनी पक्षाचे संघटन, महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. याशिवाय, दिल्लीत उपस्थित असलेल्या महायुतीच्या इतर घटक पक्षांतील नेत्यांसोबतही अनौपचारिक संवाद साधण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

काही घटकांकडून या औपचारिक भेटीला विनाकारण राजकीय रंग देण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी हा महायुतीचा एक महत्त्वाचा आणि मजबूत घटक पक्ष असून, सुनेत्रा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण पक्ष एकसंधपणे काम करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पक्षातील अंतर्गत कलहाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये विजय आणि पराभव होत असतात. मात्र, पराभव झाल्यानंतर आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून, पक्ष निश्चितपणे त्यावर विचार करेल, असेही त्यांनी सांगितले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech