नवी दिल्ली : भारत सरकारच्या मान्यतेने, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency) ३ मे २०२६ रोजी झालेली नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द करण्याचा आणि ती वेगळ्या अधिसूचित तारखांवर पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा परीक्षेचे शुल्क पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही.
भारत सरकारने सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीए या तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल आणि तपासासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, नोंदी आणि सहाय्य प्रदान करेल. पुनर्परीक्षेसाठी कोणतीही नवीन नोंदणी आवश्यक असणार नाही, तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. शिवाय, विद्यार्थ्यांनी आधीच भरलेले कोणतेही शुल्क त्यांना परत केले जाईल. यावेळी, NTA आपल्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुनर्परीक्षा आयोजित करेल. पुनर्परीक्षेसंदर्भात पुढील माहिती येत्या काही दिवसांत अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाईल.
गेल्या ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटीचा संशय निर्माण होऊ लागला होता. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांकडे हस्तलिखित अंदाजपत्रके सापडली, ज्यातील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळणारे असल्याचे म्हटले जात होते. यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. १० मे रोजी, गुप्त माहितीच्या आधारे, राजस्थान विशेष कृती गटाने (एसओजी) डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथून १३ संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सीकरमधील एका कोचिंग संस्थेशी संबंधित करिअर समुपदेशकाचाही समावेश होता.
रविवारी, एनटीएने सांगितले होते की, जीपीएस ट्रॅकिंग असलेल्या वाहनांद्वारे प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. त्यावर एक विशिष्ट आणि शोधता येण्याजोगा वॉटरमार्क होता. एका केंद्रीय नियंत्रण कक्षातून एआय-सहाय्यित सीसीटीव्ही प्रणालीचा वापर करून परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवली जात होती. सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली आणि केंद्रांवर ५जी जॅमर बसवण्यात आले होते.
दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती गटाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) विशाल बन्सल यांनी सांगितले की, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना कथितरित्या वाटण्यात आलेल्या गेस पेपरवर सध्या तपास केंद्रित आहे. या गेस पेपरमध्ये अंदाजे ४१० प्रश्न होते. यापैकी सुमारे १२० प्रश्न रसायनशास्त्राचे होते, असा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा गेस पेपर परीक्षेच्या खूप आधी विद्यार्थ्यांना वाटला जात होता आणि तो परीक्षेच्या १५ दिवस ते एक महिना आधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होता. आमचा तपास याच गेस पेपरच्या आधारे सुरू आहे.
यावर्षी देशभरातील जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट (यूजी) २०२६ परीक्षा दिली. ही परीक्षा देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये घेण्यात आली होती. आणि एकूण २२.७९ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो उमेदवार आणि पालकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.