महाराष्ट्राने गमावला शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेला दीपस्तंभ
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेला शिक्षणव्रती, कुशल प्रशासक आणि लोकनेता गमावला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय मानले जाते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखो विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे बुधवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील ‘यशवंत निवास’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येणार असून कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील यांची राजकीय कारकीर्दही उल्लेखनीय राहिली. १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करण्यास सुरुवात केली.
केवळ शिक्षणच नव्हे, तर क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या. नवी मुंबईतील प्रसिद्ध ‘डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम’ हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले. याशिवाय गरिबांसाठी अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संशोधन केंद्रे सुरू करून त्यांनी आरोग्य सेवेत मोठा हातभार लावला.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप गावातील साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संघर्षातून पुढे आलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपालपद भूषविले. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रवासाला सुरुवात केली.
पुढे डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, वास्तुकला आणि कृषी अशा विविध शाखांमध्ये अनेक संस्था उभारण्यात आल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची जडणघडण करण्याचा डॉ. पाटील यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.