पीसीआयतर्फे नागपुरात जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचा राज्यस्तरीय सोहळा
नागपूर : प्रतिजैविकांचा वाढता आणि अनावश्यक वापर रोखून सूक्ष्मजीवांच्या औषध प्रतिकाराच्या (एएमआर) समस्येवर मात करण्यासाठी फार्मासिस्टनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन भारतीय फार्मसी परिषदेचे (पीसीआय) अध्यक्ष डॉ. मोंटू कुमार पटेल यांनी केले. औषध वितरणाबरोबरच रुग्ण समुपदेशन, जनजागृती आणि औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणे ही फार्मासिस्टची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय फार्मसी परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ चा महाराष्ट्रातील (विदर्भ विभाग) राज्यस्तरीय सोहळा शनिवारी नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. ‘स्वस्थ भारत : सूक्ष्मजीवांच्या औषध प्रतिकाराचा सामना’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. विदर्भातील ८० हून अधिक फार्मसी संस्थांमधील सुमारे ३ हजार विद्यार्थी, प्राध्यापक आणि फार्मासिस्ट यांनी यात सहभाग घेतला.

यावेळी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी वाढत्या औषध प्रतिकारामुळे प्रतिजैविकांची परिणामकारकता कमी होण्याचा धोका व्यक्त केला. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधन, पुराव्याधारित उपचारपद्धती आणि रुग्णांचे प्रभावी समुपदेशन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मासिस्टकडे तांत्रिक ज्ञानासोबतच चिकित्सक विचार आणि संवादकौशल्ये असणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे अध्यक्ष धनंजय जोशी यांनी बदलत्या आरोग्यसेवा व्यवस्थेत फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी फार्मासिस्टचे प्रशिक्षण आणि सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात फार्मसी विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीने झाली. यानंतर एएमआर विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. फार्मा क्विझ, पोस्टर सादरीकरण, सायटून आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रतिजैविकांचा विवेकपूर्ण वापर, जबाबदार औषध वितरण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून औषधांची परिणामकारकता टिकवून ठेवण्याचा सामूहिक संकल्प या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.