नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार विजेते, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले, “डी. वाय. पाटील हे परोपकार आणि विशेषतः शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेचे प्रणेते होते. त्यांनी नेहमी इतरांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले.” पंतप्रधानांनी आपल्या संदेशासोबत डॉ. पाटील यांच्यासोबतच्या भेटीचा एक जुना फोटो शेअर केला.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी देशभरात १८० हून अधिक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, जिथे एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.