नवी दिल्ली : महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे इमारत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळल्यानंतर आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दुःखाच्या या कठीण प्रसंगात आपण पीडित कुटुंबांच्या सोबत असल्याची सहवेदना त्यांनी व्यक्त केली असून जखमी लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी, मृतांच्या नातेवाईकांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल.
‘एक्स’ समाजमाध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की; “महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे ऐकून दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. मृत व्यक्तींच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल.