काल जे घडले तो लोकशाहीचा विजय होता-प्रियांका वाड्रा

0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांनी महिला आरक्षणासंदर्भातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना याला लोकशाहीचा मोठा विजय म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी एकजुटीने संघराज्यीय रचना कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. प्रियांका वाड्रा यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केला की, निवडणुकांच्या काळात संसदेचे अधिवेशन घाईघाईने बोलावण्यात आले आणि विधेयकाचा मसुदा केवळ एक दिवस आधी सादर करण्यात आला.

त्या म्हणाल्या, “हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट होता. सरकारला वाटले की, विधेयक मंजूर झाले तर तो विजय असेल आणि ते नामंजूर झाले तरी तो विजयच असेल.”सरकारने कायमस्वरूपी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःला ‘महिलांचा तारणहार’ म्हणून सादर करण्यासाठी महिलांना ढाल म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. हाथरस, मणिपूर आणि महिला खेळाडूंचे मुद्दे उपस्थित करत प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाबाबतचे सरकारचे दावे वास्तवाशी विसंगत आहेत.

प्रियंका वाड्रांनी दावा केला की, हा प्रस्ताव वास्तविकपणे महिला आरक्षणाबद्दल नसून मतदारसंघ पुनर्रचनेबद्दल आहे. राजकीय संतुलन बदलण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या, “विरोधी पक्ष कसे एकत्र येऊन सरकारला पराभूत करू शकतात, हे आता स्पष्ट झाले आहे याचा मला आनंद आहे.”‘काळा दिवस’ साजरा करण्यासंदर्भात त्या म्हणाल्या की, सरकारला पहिल्यांदाच मोठा राजकीय धक्का बसल्यामुळे हा दिवस पाळला जात आहे. प्रियंका वाड्रा यांनी मागणी केली की, सरकारने २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावे, जेणेकरून महिलांना खरे प्रतिनिधित्व मिळू शकेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech