पुणे : मुंबई महापालिकेच्या तुलनेत पुणे महापालिकेला होर्डिंगमधून मिळणारे उत्पन्न तब्बल दहा पट कमी असल्याने जाहिरात फलकांच्या शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन शुल्क निश्चिती करताना प्रति चौरस फूट दर किमान ७०० ते ७५० रुपये ठेवला जाऊ शकतो, असे संकेत महापालिका आयुक्तनवल किशोर रामयांनी दिले आहेत. उत्पन्न वाढीसाठी शुल्क कमी करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पुणे महापालिका आणि होर्डिंग व्यावसायिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शुल्क आकारणीवरून वाद सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये महापालिकेच्या बाजूने निकाल लागला असून, आता नवीन शुल्क धोरण तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
महापालिकेने २०१३ मध्ये जाहिरात फलकांसाठी प्रति चौरस फूट २२२ रुपये दर निश्चित केला होता. मात्र, या दराविरोधात २०१८ मध्ये होर्डिंग व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २०१३ च्या दरावर दरवर्षी १० टक्के वाढ लागू केल्यास २०२३ मध्ये हा दर ५८० रुपये होत असल्याचे नमूद केले होते.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, पुणे महापालिका नवीन जाहिरात शुल्क धोरण लागू करण्याच्या तयारीत असून, त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे.