स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी- डॉ मोहन भागवत

0

नागपूर : स्वातंत्र्य सैनिकांच्या बालिदानाचे स्मरण ठेऊन देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ भागवत म्हणाले की, स्वातंत्र्यदिन हा देशासाठी अभिमान आणि आनंदाचा दिवस आहे. देशवासियांनी १८५७ च्या उठावापासून १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत जवळपास ९० वर्षे विविध प्रकारे संघर्ष केला आणि अनेकांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी झालेला हा संघर्ष आणि बलिदान सदैव स्मरणात ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दीर्घ संघर्ष आणि असंख्य बलिदानांनंतर मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारत स्वतंत्र झाला आहे आणि त्याचे स्वातंत्र्य कायम राहील; मात्र देशाला अधिक मजबूत, सुरक्षित आणि सुखी बनविण्याची जबाबदारी अद्याप पूर्ण झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतासमोर आजही अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करताना देशाने आपल्या मूलभूत विचारांशी आणि तत्त्वांशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. देशाची एकता, सुरक्षा आणि विकास यासाठी नागरिकांनी जबाबदारीने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोहन भागवत यांनी भारताने जगात महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावणारे राष्ट्र बनले पाहिजे, असे मत व्यक्त केले. भारताला ‘विश्वगुरू’ बनविण्याच्या दिशेने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.भारताची प्रगती केवळ आर्थिक किंवा राष्ट्रीय विकासापुरती मर्यादित राहू नये. आपल्या क्षमता आणि मूल्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या दिशेने देशाने वाटचाल केली पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोहन भागवत यांनी देशवासीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेण्याचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचा आणि देशाचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech