पटना : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडीत सम्राट चौधरी यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. बिहार भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हा सर्वसम्मतीने हा निर्णय घेण्यात आला. नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर झालेला हा बदल भाजपाची आगामी व्यूहरचना अधोरेखित करणारा आहे. बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिहारमधील सत्तांतरामुळे राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल झाले आहेत. भाजपाने नव्या नेतृत्वाच्या रूपात चौधरी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
सम्राट चौधरी हे दीर्घकाळापासून भाजपमध्ये असून त्यांनी पक्षात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या प्रशासकीय क्षमतेला प्राधान्य देत पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. चौधरी यांचा बुधवारी शपथविधी समारंभ होण्याची शक्यता असून राजभवनात तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौधरी यांच्या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात येत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय बिहारच्या राजकारणातील मोठा टप्पा असून नव्या सरकारकडून विकास आणि सुशासनाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.
सम्राट चौधरी हे बिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या प्रभावी राजकीय रणनीती आणि संघटन कौशल्यासाठी ते ओळखले जातात. मजबूत राजकीय पार्श्वभूमी आणि दीर्घ अनुभवामुळे त्यांनी राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी बिहारमध्ये प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मदुरैच्या कामराज विद्यापीठ येथून उच्च शिक्षण घेतलेआहे. राजकारणात त्यांनी १९९० च्या दशकात प्रवेश केला. आमदार, कृषी मंत्री, तसेच नगर विकास, गृहनिर्माण आणि पंचायती राज यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी भूषवली आहेत.नंतर ते बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. २०२५ च्या विधानसभा निवडणुकांनंतरही ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली आहे.