महिलांचा हक्क डावलणाऱ्या विरोधकांविरोधात राज्यव्यापी आंदोलन – मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई : संसदेत ज्या विरोधकांनी २०२३ साली महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन व जनगणनेप्रमाणे लागू होईल हे मान्य केले होते, त्यांनीच आता एनडीएकडे दोन तृतीयांश बहुमत नसल्याचे लक्षात येताच सरड्यासारखा रंग बदलला, आणि विधेयकाच्या विरोधात मतदान करून विधेयक नामंजूर केले. यामुळे लोकसभेतील महिलांच्या सहभागाच्या हक्कांची भ्रूणहत्या झाली आहे. महिलांचे हक्क डावलणारे प्रतिगामी मानसिकतेचे विरोधी पक्ष हे त्याचे मारेकरी आहेत. त्यांनी देशातील नारीशक्तीचा अपमान केला आहे. त्यामुळे गेल्या १७ एप्रिल रोजी संसदेत जे घडले, तो देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. अशा महिलांच्या अधिकारांची अशी हत्या होत असेल, तर विरोधक गुडघे टेकून महिलांच्या हक्कांबाबत मान्यता देतील, असा अभूतपूर्व जनमताचा रेटा उभा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, खा. ज्योती वाघमारे, महापौर रितू तावडे आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा सुनिता रामनाथकर उपस्थित होते.

या विधेयकाच्या समर्थनार्थ आम्ही महाराष्ट्रातून एक कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार आहोत, राज्यात पक्षातर्फे मेळावे आयोजित करण्यात आले असून महायुतीमधील सगळे पक्ष एकत्र येऊन काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष, उबाठा आदी विरोधकांचा महिलाविरोधी चेहरा उघडा करतील. जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण मिळत नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

राहुल गांधी खोटारडेपणाच्या स्पर्धेतील विजेते
जर रालोआकडे दोन तृतीयांश बहुमत असते, तर कोणालाही विरोध करायची हिंमत झाली नसती. पण त्यांना ही संधी दिसली, आणि महिलांचा हक्क डावलण्याची चूक त्यांनी केली.एखादी व्यक्ती किती खोटे बोलू शकते याच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्या तर त्याचे सुवर्णपदक राहुल गांधींना मिळतील. हे विधेयक म्हणजे संविधानाने दिलेल्या संकेतांनुसारच होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला आरक्षणासाठी आग्रही होते. आज संविधान सभेत त्यांनी व्यक्त केलेल्या विचारास अनुकूल असलेली कृती करत असताना त्यांनी हे हाणून पाडले, आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे, पण ते तसे करणार नाहीत, असेही फडणवीस यांनी नमूद केले. महिला विरोधाचीच मानसिकता! फडणवीस म्हणाले की, या विधेयकाचा प्रवास पाहिला, तर काँग्रेससह सर्व विरोधकांची मानसिकता नेहमीच विरोधाची राहिली हे लक्षात येते. अटलजींनी तीन वेळा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचे सरकार असतानाही त्यांनी हे विधेयक आणलेच नाही. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यांनी तर थेट विरोध केला होता. ही विरोधकांची मानसिकता आहे आणि काँग्रेस हे या मानसिकतेचे प्रतीक आहे. २०२३ ला विधेयक मंजूर झाले याचा अर्थच, सर्वांना ते मंजूर होते. पण सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत नाही हे लक्षात येताच विरोधकांनी आपली मानसिकता पुन्हा दाखवून दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech