लालपरी’ पुन्हा थांबणार…..?

0

२९ जूनपासून राज्यभर एसटीच्या चक्का जामचा कर्मचारी संघटनांचा इशारा…..!
(अनंत नलावडे)|

मुंबई : राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळावर पुन्हा एकदा संपाचे सावट दाटले आहे.कारण आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने २९ जूनपासून राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा दिल्याने लालपरीची चाके थांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात आणि ग्रामीण भागातील प्रवासाची गरज वाढत असताना हा इशारा समोर आल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ११ जून रोजी झालेल्या बैठकीत संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला. प्रामुख्याने

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी, कंत्राटी भरती बंद करणे, महामंडळासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद, स्वमालकीच्या ई-बसेसची खरेदी आणि कामगारविरोधी धोरणे मागे घेणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडले जाणार आहे.

आंदोलनाची तीन टप्प्यांत तयारी…….
१५ जून : आगार व विभागीय कार्यालयांसमोर घंटानाद आणि महाआरती आंदोलन
२२ जून : राज्यभर द्वार सभा व जनजागृती मोहीम
२९ जून : मुंबईसह प्रमुख एसटी केंद्रे, कार्यशाळा आणि आगारांवर बेमुदत धरणे व ‘चक्का जाम’
सरकारसमोर मोठे आव्हान……

एस टी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर उभे केलेले हे आंदोलन सरकारसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा न निघाल्यास राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असून, ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो.आता एसटी कामगार संघटनांनी सरकारला थेट इशारा देत २९ जूनपासून निर्णायक लढ्याचा एल्गार पुकारल्याने आता सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech