मुंबई : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, रोषणाई आणि आपुलकीचा सण मात्र या सणाचा खरा आनंद तेव्हाच द्विगुणित होतो, जेव्हा आपल्या आनंदात आपण इतरांनाही सहभागी करून घेतो. हीच भावना जपत अभिनेत्री अक्षया नाईकने यंदाची दिवाळी एका खास आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमातून साजरी केली. केवळ स्वतःच्या कुटुंबासोबत सण साजरा न करता, तिने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. ‘Clowns Without Borders India’ यांच्या पुढाकाराने शीटल माता ओल्ड एज होम आणि चाइल्ड सेफ फाउंडेशन येथे दिवाळी साजरी करण्यात आली. या खास उपक्रमात अभिनेत्री अक्षया नाईक सहभागी झाली होती. या वेळी उपस्थित मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, उत्साह आणि आनंदाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते. रंगीबेरंगी सजावट, रोषणाई, फुगे आणि विविध भेटवस्तूंमुळे दिवाळीचा उत्साह आणखी वाढला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते क्लाऊन्स अर्थात विदूषक! त्यांच्या मजेशीर वेशभूषेने, हावभावांनी आणि मनोरंजक सादरीकरणाने मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवत दिवाळीचा सण अधिक खास करण्यात आला. या वेळी मुलांसाठी भेटवस्तू आणि दिवाळीच्या आनंदाशी निगडित साहित्यही आणण्यात आले होते. दिवाळीच्या सणात प्रत्येकाला नवीन कपडे, फराळ, फटाके आणि भेटवस्तूंचा आनंद घ्यायला आवडतो. मात्र समाजातील अनेक घटकांसाठी हा आनंद मिळवणे नेहमीच शक्य होत नाही. अशा वेळी त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. अक्षया नाईकने या उपक्रमात सहभागी होत याच भावनेचा सुंदर प्रत्यय दिला.
विशेष म्हणजे, सण-उत्सव हे केवळ रोषणाई आणि सजावटीपुरते मर्यादित नसून माणसांना माणसांशी जोडण्याची संधी असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद हेच या दिवाळी सेलिब्रेशनचे खरे वैशिष्ट्य ठरले. अभिनेत्री अक्षया नाईकने साजरी केलेली ही अनोखी दिवाळी निश्चितच एक सुंदर संदेश देणारी आहे. कारण दिवाळीचा खरा प्रकाश दिव्यांच्या रोषणाईतच नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचा एक दिवा पेटवण्यातही असतो. ‘एक दिवाळी सामाजिक बांधिलकीसाठी’ या भावनेतून साजरा झालेला हा उपक्रम यंदाच्या दिवाळीतील एक खास आणि हृदयस्पर्शी आठवण ठरला आहे!