मृत वारकऱ्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत

0

जखमींवर मोफत उपचार करण्याचे उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश
मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.

यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, श्री. भावार्थ देखणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech