अफवांना बळी न पडण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन; संजय राऊत म्हणाले, “टायगरचा लांडगा करू!”
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून पक्षनिष्ठेवर शिक्कामोर्तब
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्य पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी लोकसभा खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत पक्षाने आपली भक्कम एकजूट दाखवून देत फुटीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बैठकीला पक्षाचे ४ खासदार प्रत्यक्ष तर ५ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विरोधकांच्या अफवांना बळी न पडता, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. शिवसेना नेते संजय राऊतांनी, “टायगरचा लांडगा करू,” असा घणाघाती टोला लगावला. दरम्यान, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून पक्षनिष्ठेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व ९ खासदारांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी खासदारांना एकता आणि संघटनेचा तसेच कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याचा कानमंत्र दिला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या फुटीच्या अफवांना बळी पडू नका. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये यासाठी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधा.” केवळ राजकीय साठमारीत न अडकता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा असून, पुढील महिन्यात पुन्हा अशाच प्रकारची आढावा बैठक घेणार असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले.
सर्वच्या सर्व ९ खासदार उपस्थित
ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण ९ खासदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’मुळे काही खासदार फुटणार, अशा वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र, आजच्या बैठकीला सर्वच्या सर्व ९ खासदार (प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन) उपस्थित होते. त्यामुळे कोणीही गैरहजर नव्हते, फक्त काहींनी अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष येण्याऐवजी डिजिटल माध्यमातून हजेरी लावली.
प्रत्यक्ष हजर असलेले ४ खासदार:
राजाभाऊ वाजे (नाशिक): नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे या बैठकीला प्रत्यक्ष ‘मातोश्री’वर उपस्थित होते.
अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई)
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
ऑनलाईन उपस्थित असलेले ५ खासदार
जे खासदार वैयक्तिक किंवा कौटुंबिक अपरिहार्य कारणांमुळे मुंबईत येऊ शकले नाहीत, त्यांनी डिजिटल माध्यमातून हजेरी लावली.
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): सकाळपासून ते ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या अफवा होत्या. परंतु, त्यांच्या पत्नी आजारी असल्याने ते ‘मातोश्री’वर येऊ शकले नाहीत; त्यांनी घरूनच ऑनलाईन सहभाग नोंदवला.
ओमराजे निंबाळकर (धाराशिव): मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातूनच त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.
संजय जाधव (परभणी): यांच्या भूमिकेबाबत आणि संपर्काबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र त्यांनीही बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.
याशिवाय नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) आणि संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम) यांनीही ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
“आम्ही टायगरचा लांडगा करू…” – संजय राऊतांचा घणाघात
बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर सडकून टीका केली. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून खासदार फोडण्याच्या चर्चांवर प्रहार करताना राऊत यांनी आपल्या खास आक्रमक शैलीत टोला लगावला. राऊत म्हणाल4 की, “उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला पक्षाचे १०० टक्के खासदार उपस्थित होते. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, ते ऑनलाईन होते. त्यामुळे कोणीही आमच्यात फूट पडेल या भ्रमात राहू नये. कसले आलेय ऑपरेशन टायगर? आमच्या नादाला लागू नका, नाहीतर आम्ही तुमच्या या टायगरचा लांडगा करू. आमचे सर्व खासदार निष्ठेने उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिंदे गटाने स्वतःचे बघावे, आमची चिंता करू नये.”
खासदार प्रतिक्रिया
राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक): वाजे यांनी आपल्या पक्षनिष्ठेवर शिक्कामोर्तब करताना स्पष्ट केले की, “आमचा कोणताही खासदार उद्धवजींची साथ सोडणार नाही. याबाबत मी आधीही अनेकदा स्पष्ट केले आहे. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही आणि मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेने एका विशिष्ट विचारधारेसाठी आम्हाला मते दिली आहेत, त्यामुळे अफवा पसरवून आमची बदनामी करू नये.” एकूणच, या बैठकीतून शिवसेना उद्धव गटाच्या नेत्यांनी आपल्या पक्षावरील पकड मजबूत असल्याचे आणि सर्व खासदार एकसंध असल्याचे सिद्ध करत राजकीय विरोधकांना जोरदार चपराक लगावली आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर
शिवसेना खासदार बैठकीबाबात शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याच पक्षातील इतर नेत्यांच्या दाव्यांना छेद दिला. पाटील म्हणाले की, “शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काही नाही. ज्यांना ज्या पक्षात जायचे असते ते जातातच.” भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या या बैठकीवर टीका केली. ते म्हणाले की, “ठाकरेंचे आता डोक्यावरून पाणी गेले असून त्यांच्या खासदारांचा आमच्याकडे येण्याचा विचार पक्का आहे.”