बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांत उद्धव ठाकरेंचे दौरे

0

मुंबई : शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार अनुपस्थित राहिले होते. त्याआधी मातोश्री निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीलाही या खासदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भातील पत्र लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचीही माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या सहा बंडखोर लोकसभा खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी थेट मतदारसंघांत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची रणनीती आखली आहे. २१ जून रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप आणि कांजूरमार्ग येथील दौऱ्याने या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर २७ जून रोजी यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली, २८ जून रोजी परभणी आणि धाराशिव, तर २९ जून रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यात येणार आहे.

या दौऱ्यांदरम्यान उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असून, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. पक्षातील घडामोडींमुळे निर्माण झालेली नाराजी आणि संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच भावनिक आवाहन करत पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहनही ते कार्यकर्त्यांना करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील नव्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech