मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील १७ पैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर उर्वरित ११ जागांचे निकाल जाहीर झाले. यापूर्वीच ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.
या निवडणुकीत भाजपने ११ जागा, शिवसेनेने ४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागा जिंकल्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराच्या खात्यात गेली. त्यामुळे विधान परिषदेत महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत विजयी होण्यासाठी वैध मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा एक मत अधिक असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना केली जाते.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. तर निवडणूक झालेल्या जागांमध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट, भंडारा-गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, सांगली-सातारातून धैर्यशील कदम, परभणी-हिंगोलीतून सईद खान, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, नागपूरमधून राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन, अमरावतीतून प्रवीण पोटे आणि नांदेडमधून अमर राजूरकर विजयी झाले.
मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिल्यास नाशिक आणि भंडारा-गोंदिया येथे शंभर टक्के मतदान झाले. सांगली-सातारा येथे ९९.८९ टक्के, परभणी-हिंगोली येथे ९९.७८ टक्के, सोलापूरमध्ये ९९.६८ टक्के, तर धाराशिव-लातूर-बीडमध्ये ९९.४९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नागपूरमध्ये ९८.४४ टक्के आणि जळगावमध्ये ९७.७८ टक्के मतदान झाले.
मतदारसंघनिहाय ताकदीचा विचार केला असता नागपूरमध्ये भाजपकडे ५०१ सदस्यांचे स्पष्ट वर्चस्व होते, तर धाराशिव-लातूर-बीडमध्ये भाजपकडे ३७९ आणि सांगली-सातारात ३७१ सदस्यांचे पाठबळ होते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३७५ सदस्यांची ताकद होती. नाशिकमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत दिसून आली. मात्र अखेरीस गोकुळ गिते यांच्या विजयामुळे या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय चर्चा नाशिकमध्ये रंगली. महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, तर महायुतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड अधिक मजबूत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.