अनिकेत तटकरेंचा राजीनामा मागणारा तू कोण?; भरत भगत यांचा महेंद्र थोरवेंवर पलटवार

0

रायगड : खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली. तटकरे यांच्यावर बोलण्याची थोरवे यांची पात्रता नसल्याचा घणाघात त्यांनी केला. मतदारसंघातील एका कंपनीला थोरवे यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. या टीकेवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच त्यांनी सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर आरोप सुरू केल्याचा दावा भगत यांनी केला.

अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना भगत म्हणाले की, त्यांचा राजीनामा मागणारे महेंद्र थोरवे कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार नाही. थोरवे यांना एवढीच हिंमत असेल तर त्यांनी स्वतः आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्यास आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर थोरवे यांनी घेतलेल्या भूमिकेवरही भगत यांनी टीका केली. पर्यावरणाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका घेणे अपेक्षित असताना थोरवे प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे असल्याचा आरोप त्यांनी केला. यापुढे सुनील तटकरे यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही भरत भगत यांनी दिला. या आरोपांमुळे रायगडमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech