विशेष एनआयए न्यायालयाने ठोठावली शिक्षा
मुंबई : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित २०२३ मधील दहशतवादी कट प्रकरणात दोषी ठरलेल्या भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता. डॉ. अदनान अली सरकार याने न्यायालयात आपली बाजू मांडताना केलेल्या कृत्यांचा पश्चात्ताप होत असल्याचे सांगितले. तसेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करून आपण गुन्ह्याची कबुली देत असल्याचे त्याने नमूद केले.विशेष एनआयए न्यायाधीश अभय ए. जोगळेकर यांनी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली त्याला दोषी ठरवले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा त्याचा पहिलाच गुन्हा असला, तरी अशा प्रकारच्या कृत्यांना समाजात थारा मिळू नये, यासाठी कठोर संदेश जाणे गरजेचे असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले.विशेषतः अशा देशविघातक घटकांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, आयएस दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर डॉ. अदनान अली सरकार याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला सक्रिय पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयामुळे दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या घटकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा संदेश देण्यात आला आहे.