उत्तर भारतात थंडी-धुक्याचा प्रभाव; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा जारी

0

नवी दिल्ली :  देशाच्या विविध भागांतील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा प्रभाव वाढत असताना दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील तीन दिवस सकाळच्या वेळी धुके पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान सकाळच्या वेळी मध्यम ते हलक्या स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय, ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खालच्या वातावरणात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे, तर ८ नोव्हेंबर रोजी केरळ आणि माहे येथे ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, १० नोव्हेंबरपासून सक्रिय होणाऱ्या नव्या पश्चिमी वाऱ्यांमुळे उत्तर-पश्चिम हिमालयीन भागातील हवामानात बदल होणार आहे. १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस तसेच वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. विशेषतः १२ नोव्हेंबर रोजी काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी होऊ शकते.

अंदमान आणि निकोबार बेटांवर ८ ते १३ नोव्हेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची, तर ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ईशान्य भारतात १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech