पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ६ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान होणार आहे. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक ६ डिसेंबरपासून राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे, तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीपासून : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असेल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणारे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानुसारच परीक्षेची तयारी करावी. अन्य संकेतस्थळांवर किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. माळी यांनी केले आहे.