हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी; तपासणीनंतर धमकी अफवा असल्याचे स्पष्ट

0

चेन्नई : हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील स्वच्छतागृहात एका टिश्यू पेपरवर ‘बूम १.५० पीएम’ असे लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने शुक्रवारी विमानात बॉम्ब असल्याची भीती पसरली. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.ही माहिती मिळताच वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला. त्यानंतर १९२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानाला दुपारी सुमारे एक वाजता चेन्नई विमानतळावर प्राधान्याने सुरक्षित उतरवण्यात आले.विमान उतरल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली. या तपासणीत बॉम्बची धमकी केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबादहून चेन्नईच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान विमानातील एका कर्मचाऱ्याचे लक्ष स्वच्छतागृहातील आरशावर चिकटवलेल्या टिश्यू पेपरकडे गेले. त्यावर ‘बूम १.५० पीएम’ असे लिहिलेले होते. कर्मचाऱ्याने तातडीने याची माहिती वैमानिकाला दिली. त्यानंतर वैमानिकाने चेन्नई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती दिली आणि विमानाच्या प्राधान्याने उतरवण्याची परवानगी मागितली.

विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर ते मुख्य विमानतळापासून दूर असलेल्या स्वतंत्र जागेवर (रिमोट बे) नेण्यात आले. त्यानंतर श्वानपथकासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानात प्रवेश करून तपासणी सुरू केली. प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली. तसेच संपूर्ण विमानाचीही तपासणी करण्यात आली.सुमारे तासभर चाललेल्या तपासणी आणि चौकशीनंतर सुरक्षा यंत्रणांनी बॉम्बची धमकी अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech