यूएईत भीषण रस्ते अपघात; भारतीयांसह १४ जणांचा मृत्यू, ३० जखमी

0

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह अमिरातीत झालेल्या भीषण रस्ते अपघातात भारतीय नागरिकांसह १४ जणांचा मृत्यू झाला असून, अन्य ३० जण जखमी झाले आहेत. एका अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेनंतर वाहनांना भीषण आग लागली. संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शोकाकुल कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह संयुक्त अरब अमिरातीतील स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. तर जखमींमध्ये भारत, संयुक्त अरब अमिराती, ओमान, ब्राझील, पाकिस्तान, जॉर्डन आणि इजिप्त या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या गृह मंत्रालयाने प्राथमिक माहितीनुसार ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, अपघातानंतर आपत्कालीन मदत पथके आणि विशेष बचाव पथकांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. मदत आणि बचाव पथकांकडून अपघाताच्या परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासह जखमींना मदत करण्याचे काम सुरू आहे. अपघातात सहभागी असलेल्या वाहनांची संख्या पाहता दुर्घटनेची भीषणता लक्षात येते. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि वाहनांची धडक कोणत्या परिस्थितीत झाली, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech