मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मला आदेश द्यावेत, सतेज पाटलांचं साम्राज्य पाच मिनिटात उद्ध्वस्त करतो, अशी घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याचाच पुनरुच्चार करत सतेज पाटील यांना कायद्यानेच वेसण घालणार, खासगी शिक्षणचालकांच्या मनमानी फी विरोधात कायदा आणणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि नंतर अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सतेज पाटील आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या गेल्या. अध्यक्षपदी महायुतीचा संचालक बसल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर जाहीर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा, सतेज पाटलांचं साम्राज्य उद्ध्वस्त करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. दरम्यान आज चंद्रकात पाटील म्हणाले की, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कोणी वाकडं बोललं तर सहन करणार नाही. त्यामुळेच सतेज पाटलांवर उद्ध्वस्त करण्याची टीका केली. खरं सांगायचं तर मी काही केलं नाही, सुप्रीम कोर्टानंच शिक्षण संस्थाचालकांची झोप उडवली. एका विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर न्यायालयाने मोठी प्रश्नावली दिली आहे. त्यावर दिवाळी संपल्यानंतर उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठ चालकांची झोप उडणार आहे हे नक्की.
शुल्क नियामक प्राधिकरण (एफआरए) कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून सतेज पाटील सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचे, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या मार्च महिन्यात एफआरए कायदा आणणार आहे. त्या माध्यमातून शिक्षणचालक विद्यार्थ्यांकडून जी फी घेतात त्यावर सरकारचे नियंत्रण असेल. कुठे मनमानी फी वसुली सुरू असेल तर त्यावर सरकार कारवाई करणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. डी.वाय. पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे समोर येईल, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना इशारा दिला.