नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाच्या निर्यातीत ऑक्टोबर महिन्यात जवळपास ३० टक्क्यांची दमदार वाढ नोंदविण्यात आली असून, निर्यात ८९.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात ६९.२७ अब्ज डॉलर होती. त्याचबरोबर व्यापारातील तूट कमी होऊन २०.०९ अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापारातील तूट २५.१५ अब्ज डॉलर होती. निर्यातीतील वाढीमुळे देशाची व्यापारविषयक स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये आयात वाढून ११०.०७ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ९४.४२ अब्ज डॉलर होती. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६-२७ या कालावधीत रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२५-२६ या कालावधीच्या तुलनेत ४०.०६ टक्क्यांची वाढ होऊन ती ३.२१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. मंत्रालयाने सांगितले की, एप्रिल ते ऑक्टोबर २०२५-२६ च्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६-२७ या कालावधीत सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायनांच्या निर्यातीत ३६.२० टक्क्यांची वाढ होऊन ती २.८९ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर २०२५-२६ च्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६-२७ या कालावधीत अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत ३६.०१ टक्क्यांची वाढ होऊन ती १२.७४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात वाढून ६.६४ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत यात ६२.७० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या निर्यातीमुळे भारताच्या एकूण वस्तू निर्यातीला बळ मिळत आहे.
भारताच्या वस्तू निर्यातीत २१.९६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत वस्तूंची निर्यात वाढून ३०९.०६ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ही २१.९६ टक्क्यांची वाढ आहे. ही वाढ भारताच्या वस्तू निर्यातीची मजबूत स्थिती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढते योगदान दर्शविते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताची वस्तू आणि सेवा यांसह एकूण निर्यात वाढून ५६८.८४ अब्ज अमेरिकन डॉलर होण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत यात १६.६६ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ही वाढ जागतिक व्यापारातील भारताचा वाढता सहभाग तसेच वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत सातत्याने होत असलेली वाढ दर्शविते.