मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळामुळे देशातील आठ राज्यांमध्ये पुढील चार आठवड्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत देशाच्या विविध भागांत पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागांचाही समावेश आहे. विशेषतः कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढण्यासह दाट धुक्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अकवान’ चक्रीवादळ गुरुवारी रात्री अधिक तीव्र झाले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ २० नोव्हेंबर रोजी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूरजवळ या वादळाचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून ताशी १९ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हे वादळ आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून १७० किलोमीटर, विशाखापट्टणमपासून २०० किलोमीटर आणि ओडिशातील गोपाळपूरपासून २४० किलोमीटर अंतरावर होते. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी तो ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. विशाखापट्टणम किनारपट्टीवर ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. विशाखापट्टणमला थेट चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला, तरी उत्तर आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. १९ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंड, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्येही पावसाचे संकेत आहेत. २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पाऊस पडू शकतो. ३ ते १० डिसेंबर या कालावधीत दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. याच काळात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही पावसाचे संकेत आहेत. तर १० ते १७ डिसेंबरदरम्यान तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीपासून डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशातील विविध भागांतील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.